Ahmednagar News : क्लासला जाताना त्रास देणाऱ्या तरूणांची तक्रार आईकडे केली. आईने मुलांना समजावून सांगितले आणि त्यांच्या वडीलांनाही सांगितले. परंतु, तरूणांनी या मुलीला त्रास देणे बंद न केल्याने इ.१०वीत ८३ टक्के मार्क मिळवणाऱ्या तरूणीला अखेर या तरूणांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ येण्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे.
सदर तरुणीने १४ जून रोजी सकाळी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला होता.

त्यामुळे आता दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीची आई सुरेखा विश्वास शिंदे यांनी गुरुवारी राहुरी पोलिसात फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली. तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जागृती विश्वास शिंदे या तरुणीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून १४ जून २०२४ रोजी सकाळी टाकळीमिया हद्दीत रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती.
दहावीच्या निकालानंतर जागृतीने अकरावी वर्गात प्रवेश घेऊन कॉलेजचे शिक्षण सुरू केले होते. ती क्लासला जात-येत असताना काही रोडरोमिओ तिची छेडछाड करीत होते.
याबाबत तिने आईला सांगितले. त्यावेळी आईने या रोडरोमिओंना भेटून मुलीला त्रास देऊ नका, तिला परत फोन करू नका, अशी समज दिली होती. त्यानंतरही रोडरोमिओंकडून छेडछाड सुरूच होती.
या त्रासाला जागृती कंटाळून गेली होती. १४ जून २०२४ रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. नंतर तीने तालुक्यातील टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.
तरुणीच्या आईने गुरुवारी (दि.११) याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील दोन अल्पवयीन तरुणांवर भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.













