Ahmednagar News : राज्याच्या विविध भागांत पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा, तसेच उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. राज्याला मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले असतानाच केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल सुरू असून, ४ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात काही ठिकणी पावसात मोठा खंड तर काही भागात या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. तर पुणे, यवतमाळ येथे १०० टक्के, चंद्रपूर, निफाड १०३ टक्के, तर दापोली येथे १०६ टक्के पाऊस पडणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रासाठी सन २०२४ सालासाठी जून ते सप्टेंबरदरम्यानच्या मान्सूनची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. साबळे म्हणाले, महाराष्ट्रात दिलेल्या पावसाच्या अंदाजात ५ टक्के कमी अधिक होण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड, असे हवामान राहणार असल्याचे देखील ते म्हणाले.
दरम्यान, उन्हाचा चटका वाढल्याने राज्यात काहिली कायम आहे. काही भागात ढगाळ हवामान असल्यामुळे पारा किंचित घटला आहे. विदर्भात कमाल तापमानात घट झाली असली, तरी उन्हाचा चटका कायम असल्याने यवतमाळ येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगरचे तापमान ३८ अंश सेल्सिअस असे नोंदवले आहे.













