Ahmednagar News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अहमदनगर जिल्ह्याला देखील एक मोठं गिफ्ट मिळालं आहे.
अर्थमंत्र्यांनी जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली, त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे नेवासा येथील संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माण करण्याला गती मिळणार आहे.
राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहाता येथील सभेत तीर्थक्षेत्र विकासाला पैसे कमी पडू दिले जाणार नाही, अशी घोषणा केली होती.
त्याचा पुनरुच्चार नुकताच लोणी येथे केला होता. शुक्रवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ज्ञानेश्वरी रचनास्थान तीर्थक्षेत्र विकास आराखडा घेतल्याचे सभागृहात जाहीर केले.
त्यामुळे भविष्यात निधी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने मंदिर परिसर सुशोभित होऊन वैभवात भर पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली त्या मंदिराला भेट देण्यासाठी वर्षभर हजारो वारकरी, श्रद्धाळू व भाविक येत असतात.
दर एकादशीला मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. आषाढी व कार्तिकी एकादशीला तर मंदिर परिसरात आणि शहराला यात्रेचे स्वरूप येते. हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात.
आळंदी, पंढरपूरसोबत अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या माऊलींच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येतात. मात्र सुविधांअभावी भक्तांची मोठी कुचंबणा होते. गेल्या अनेक वर्षांपासून नेवासेकरांनी मंदिर विकासासाठी लढा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात विकास आराखडा तयार करण्याची घोषणा केल्याने आषाढी वारीच्या निमित्ताने पांडुरंग पावला आहे