Ahmednagar News : साईभक्ताकडून ४३ लाखांचा सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण !

Pragati
Published:

Ahmednagar News : केवळ भारतातीलच नव्हे तर देश-विदेशातील लाखो लोकांची शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा आहे. साईबाबांवर असलेल्या अपार श्रद्धेपोटी देश-विदेशातील लाखो भाविक येथे दरवर्षी भेट देतात आणि साईचरणी नतमस्तक होऊन त्यांच्या झोळीत भरभरून दान देतात.

यात विदेशी चलन, सोने, चांदी आदींचा समावेश असतो. आज एका साईभक्ताने तब्बल ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण केला आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी टाकतात. आज एका साईभक्त परिवाराने साईचरणी तब्बल ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण केला. अर्पण करण्यात आलेल्या सोनेरी मुकुटाची किंमत ४३ लाख रुपये आहे.

माझ्याकडे जे काही आहे, ती सगळी साईबाबांची कृपा आहे. आम्ही आज साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. त्याची किमत ४३ लाख रुपये असल्याचे त्या भाविकाकडून सांगण्यात आले. रविवारी सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला.

मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्‍ताने संस्थानला आपल नाव जाहीर न करण्याची विनंती केल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. दिवसेंदिवस शिर्डीच्या साईबाबांवर श्रद्धा असलेल्या भाविकांची संख्या वाढत असून, साईंच्या झोळीत दान देखील अनेक भाविक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe