Ahmednagar News : बिबट्याने ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची उडवली झोप ; बिबट्याच्या हल्यात अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : निसर्गात मानवाचा वाढत असलेला हस्तक्षेप, वनांचे घटत असलेले क्षेत्र यामुळे दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत वास्तव्य करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे या वन्यप्राण्यांपासून मानवास धोका होऊ शकतो. दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे, यापूर्वी वाड्या-वस्त्यांवरील अनेक शेळ्या व पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढवून त्यांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पिंप्री अवघड येथे दत्तात्रय कारभारी लांबे व किशोर दशरथ मोरे हे आपल्या कुटूंबाच्या उपजिविकेसाठी शेळीपालन व्यवसाय करतात. त्याचबरोबर गावातील अनेक शेतकरी ही काही प्रमाणात शेळी पालन हा व्यवसाय करत आहेत; परंतु अनेक दिवसांपासून पिंप्री अवघड परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबट्याने या शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. शुक्रवारी रात्री २ वाजता या बिबट्याने दत्तात्रय लांबे व किशोर मोरे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला करून दोन शेळ्यांना ठार केले असून एक शेळी जखमी झाली आहे.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे गोठ्‌यातील इतर जनावरेही भेदरून गेल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले. आसपासच्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती वनविभागातील अधिकारी गोरक्षनाथ मोरे व पवन निकम यांना कळवताच त्यांनी तात्काळ दखल घेत घटनेच्या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला, तसेच आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. यावेळी येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याने पिंप्री अवघड येथील वाड्या-वस्त्यांवरील अनेक शेळ्या व पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढवून त्यांची शिकार केली आहे. कामावरून सायंकाळी घरी जाणाऱ्या अनेकांना या बिबट्याने रस्त्यातच दर्शन दिल्याने जीव मुठीत धरून घरी जावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. शेतात काम करत असताना घरी असणाऱ्या लहान मुलांनाही या बिबट्यांचा धोका असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिसरातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe