Ahmednagar News : अबब ! नगरमध्ये हिरवा चारा तीन हजारांवर, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

Pragati
Published:
maka

Ahmednagar News : पावसाला सुरवात चांगली झाली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे. असे असले तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मात्र अद्याप जैसे थे च आहे. पाऊस जरी पडला तरी हिरवा चारा येण्यास अवकाश लागणार आहे. त्यामुळे सध्या हिरवा चारा अद्यापही भाव खातोय.

नगरमध्ये ऊस, मका, कडवळ या हिरव्या चाऱ्याला टनाला तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत, तर घास तीन हजार रुपये प्रती हजार पेंढी दराने विकला जात आहे. त्यामुळे दूधउत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या पाऊस समाधानकारक झाल्याने हिरवा चारा होईलच. पण साधारण हा चारा यायला महिनाभराचा कालावधी लागेल.

त्यामुळे महिनाभर तरी अव्वाच्या सव्वा भाव देऊनच हिरवा चारा खरेदी करावा लागेल असे चित्र आहे. पाऊस चांगला झाला असल्याने शेतकरी बांधवांनी मका, कडवळ, घास, मूर घास, बिन्नी गवताची लागवड सुरू केली आहे.

या चाऱ्याला किमान एक ते दीड महिन्याने जनावरांना वापरता येणार असल्याने सध्यातरी शेतकरी बांधवांना तीन हजारांच्या दरातच हिरवा चारा खरेदी करावा लागणार आहे. पेंड, वालिस, मका, भरडा या पशुखाद्याच्या दरातही वाढ झाल्याने दूध उत्पादन करणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबरोबरच वैरणीचे भावही वाढलेले आहेत.

जिल्ह्यात कोणत्या पिकाची किती पेरणी अपेक्षित?
जिल्ह्यात यंदा ५ लाख ८९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगाम पेरणीसाठी निश्चित केले आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ५० हजार ९८३ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, १ लाख २२ हजार८६ हेक्टरवर कापूस, ८७ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. यंदा ५७२ हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीचा पेरा होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय १७ हजार २७६ हेक्टरवर भात, ६० हजार ७९९ हेक्टरवर मका, ४७ हेक्टर ३७ हेक्टरवर मूग, ३६ हजार १०५ हेक्टरवर तूर, ४० हजार ४०५ हेक्टरवर उडीदचा पेरा निश्चित केला आहे. खरीप पिकांशिवाय ९४ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर नवीन उसाची लागवड अपेक्षित आहे. त्यानुसार यंदा एकूण ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe