Ahmednagar News : दोन कंटेनरचा अपघात, डिझेल टाक्या फुटून दोघे जखमी, ग्रामस्थांचा रास्तारोको

Pragati
Published:
apghat

Ahmednagar News : नगर तालुक्यातील अरणगाव परिसरात बाह्यवळण रस्त्यावर दोन कंटेनरचा अपघात होऊन त्यात दोघे जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर या आठवड्यात अरणगाव परिसरात तिसऱ्यांदा अपघात झाला.

मंगळवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी अरणगाव बाह्यवळण चौकात रास्ता रोको केला. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करत उपाययोजनांची मागणी केली.
नगर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता करण्यात आला.

या परिसरात रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. यामुळे रस्ता एकेरी करण्यात आला. बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने आणि रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीही दोन बुलेटस्वारांचा अपघात होऊन दोघे जखमी झाले होते.

मंगळवारी सकाळी अरणगाव येथील नाट मळा येथे सिंगल रस्त्यावरून चौपदरी रस्त्यावर जाताना दोन अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात होऊन दोन्ही वाहनांच्या घर्षणाने डिझेल टाक्या फुटल्या. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकायनि व चालकांचे नशीब बल्लवत्तर असल्याने या अपघातात जीवितहानी टळली.

गेल्या आठवड्यातही अरणगाव चौकात अवजड वाहनांना क्रॉस करताना राहुरी येथील मोटारसायकलवरील दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच याच भागात दोन कार एकमेकांवर आदळून दोन्ही चालक जखमी झाले. बाह्यवळण रस्त्यावरील अरणगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने अरणगाव चौक ते रेल्वे क्रॉसिंग अशी एकेरी वाहतूक सुरू आहे.

कामामुळे हा चौपदरी रस्ता दुहेरी असल्याने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे. बाह्यळवण रस्त्यावर साइडपट्ट्या, दिशादर्शक फलक लावण्यात येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून वाहतूक होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी कार्ले यांनी दिला.

अपघाताची माहिती समजताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या तसेच अरणगाव ग्रामस्थांनी गैरसोय टाळण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

घटनास्थळी बाह्यवळण रस्त्याचा दुभाजक तोडत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे काम सुरू केले. तातडीने या भागात दिशादर्शक फलक बसवण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe