Ahmednagar News : कांद्यानंतर आता ‘दूध’ही पेटणार ..! दरवाढीसाठी जनावरांसह रस्त्यावर उतरण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Pragati
Published:

Ahmednagar News : सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले होते. कांद्या उत्पादनासाठी झालेला खर्च देखील शेतकऱ्यांच्या हातात पडत नसल्याने कांदा दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. मात्र कांद्यापाठोपाठ दुधाचे देखील भाव खूप पडले आहेत. त्यामुळे दुधाचे भाव वाढावेत यासाठी दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतणार आहे. त्यामुळे कांद्यानंतर आता ‘दूध’ही पेटणार असल्याची चिन्हे आहेत.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारने पुढील ८ दिवसांमध्ये दूधाच्या दरामध्ये वाढ करावी, अन्यथा बेलपिंपळगाव फाटा येथे पाचेगाव परिसरातील गावांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात सर्व दूध उत्पादक, महिला, लहान मुले, जनावरे आदींचा समावेश करण्याचा येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत नेवासा येथील नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना नुकतेच निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, नेवासा तालुक्यातील पाचेगाव हे १० हजार लोकसंख्येचे गाव असून या गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

त्यामध्ये ८० टक्के शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून दूधाला अतिशय कमी भाव मिळत असल्याने हा धंदा करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.

सध्या प्रति लिटर २७ ते २८ रूपये दूधाला दर मिळत आहे. त्यामध्ये जनावरांना चारा, खाद्य, या सर्व गोष्टी करणे शक्य होत नाही. सद्य परीस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये दूधाचा एकही रुपया पडत नाही, त्यामुळे दूध धंद्याकडे अनेक शेतकरी पाठ फिरवताना दिसून येत आहेत.

अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच दूध व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र दुधाला अत्यल्प भाव मिळत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला आली आहे. केवळ दूधच नव्हे तर सर्वच शेतमालाला देखील भाव नसल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे.

जर सरकारने शेतकऱ्यांचा होत असलेल्या खर्चाच्या तुलनेत दूधाला ३५ ते ४० रुपये दर मिळाला तर सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अतिशय चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे आगामी आठ दिवसात याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe