Ahmednagar News : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वी च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२१) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात नगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला असून पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक (९५.१९ टक्के) मिळविला असून सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (९३.८८ टक्के) आहे.
नगर जिल्ह्यात ६१ हजार ९६६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्या पैकी ५७ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ४ हजार ०८९ विद्यार्थी नापास झाले आहे. पास होणार्यांषमध्ये मुलींचे प्रमाण ९६.४८ टक्के तर मुलांचे प्रमाण ९१.०८ टक्के एवढे आहे.
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.९०, कला शाखेचा ८२.२६, वाणिज्य शाखेचा ९२.१० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेच्या निकालात वाढ झाली आहे. मात्र कला व वाणिज्य शाखेचा निकाल घसरला आहे.
जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षीही शेवगाव तालुकाच प्रथम
१२ वी च्या परीक्षेच्या निकालात गत २ वर्षाप्रमाणे या वर्षीही शेवगाव तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे. शेवगावचा निकाल ९५.६२ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ जामखेड-९५.४७, संगमनेर ९५.२२, पारनेर ९३.८३, नगर ९४.४१, नेवासा ९४.६६, कर्जत – ९४.६०,
कोपरगाव ९२.१३, पाथर्डी ९२.७६, राहता – ९३.८७, राहुरी ९२.०३, श्रीगोंदा ९३.१७, अकोले ९०.५९ तर गतवर्षी प्रमाणे या ही वर्षी जिल्ह्यात सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा ८५.८० टक्के लागला आहे.
राज्याचा निकाल ९३.३७ टक्के
बारावीचा महाराष्ट्राचा निकाल सरासरी ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. यंदा परीक्षेला १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील वर्षीचा निकाल पाहता त्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी वाढलेली आहे. २०२३ ला बारावीचा निकाल ९१.३५ टक्के लागेलला होता.