Ahmednagar News : राज्यभरातील विविध जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना तीन महिन्यांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने पाठवण्यात आले होते. परंतु, लोकसभेसह विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना पदस्थापना न मिळाल्याने, हे शिक्षक अधांतरी होते.
मंगळवारी या १२५ शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या. त्यामुळे रिक्त पदांची संख्या कमी झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भास्कर पाटील

यांनी मंगळवारी (९ जुलै) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेमध्ये प्रथम ‘पेसा’ क्षेत्रात इच्छुक असलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली.
त्यानंतर संवर्ग १मध्ये १७, संवर्ग २ मधून ९२ आणि संवर्ग ३मध्ये १६ शिक्षकांना प्राधान्यक्रमाने ज्येष्ठतेनुसार पदस्थापना दिली. त्यामुळे आता शाळास्तरावर रिक्त असलेल्या पदांची संख्या १२५ ने कमी झालेली आहे.
अजूनही ३११ जागा रिक्त !
जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ४३६ जागा रिक्त होत्या, त्यापैकी १२५ जागांवर पदस्थापना दिल्यामुळे ३११ जागा रिक्त राहिल्या आहेत.
जिल्हांतर्गत बदल्यांबाबत संभ्रम
आंतरजिल्हाप्रमाणे जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे. त्यासाठी साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेले आहेत. परंतु, त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. काही जिल्ह्यांत अशा बदल्या झाल्या.
मात्र, नगर जिल्हा परिषद ही प्रक्रिया राबवणार आहे किंवा नाही? याबाबत शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.