Ahmednagar News : क्षमतेपेक्षा जास्त जनावरे दाटीवाटीने जखडून बांधून त्यांची अवैधपणे वाहतूक करणारा आयशर टेम्पो नगर तालुका पोलिसांच्या पथकाने नगर दौंड रोडवर खंडाळा गावच्या शिवारात बुधवारी (दि.२६) दुपारी ४ च्या सुमारास पकडला आहे.
या टेम्पोतून १० जनावरांची सुटका करण्यात आली असून टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोरक्षक अविनाश सतीश सरोदे (रा. वाळूज, ता. नगर) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बुधवारी (दि.२६) दुपारी नगर दौंड रोडवर एक आयशर टेम्पोतून जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी नगर तालुका पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी आणि गोरक्षकांनी त्या आयशर टेम्पोचा पाठलाग करत खंडाळा शिवारात तो पकडला.
त्यामध्ये १० जनावरे दाटीवाटीने बांधलेली आढळली. पोलिसांनी टेम्पो चालकाला याबाबत विचारणा केली असता तो समर्पक उत्तर देवू शकला नाही. पोलिसांनी जनावरांसह टेम्पो पोलिस ठाण्यात नेला. तेथे टेम्पो चालक अर्शद शेख (रा. जेऊर, ता. नगर) याच्या विरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.