Ahmednagar News : विविध शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार केल्याच्या तक्रारीवरून अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका नामांकित रुग्णालयावर संबंधित योजनांच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल दुपारी छापा टाकला.
या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची तब्बल चार तास तपासणी केली. या छाप्यात नेमके काय सापडले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुग्णांसाठी विविध योजना राबविल्या जातात. महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर योजनांचा यामध्ये समावेश आहे. रुग्णांना आर्थिक त्रास होऊ नये या उद्देशाने या योजना राबविल्या जातात.
अहमदनगर जिल्ह्यातील काही दवाखाने या योजना राबविण्यासाठी शासनाने निवडले आहेत. विविध प्रकारच्या आजारांसाठी शासनाकडून या रुग्णालयांना पैसे दिले जातात. या योजनांमध्ये मोठा गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका रुग्णालयात या योजनांचा लाभ रुग्णांना दिला जातो.
या योजनेतून शासनाकडून पैसे मिळत असतानाही या रुग्णालयाकडून रुग्णांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी मुंबई येथे केल्या होत्या. या तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई येथील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी काल शुक्रवारी दुपारी अचानक या रुग्णालयावर छापा टाकला. या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची तब्बल चार तास तपासणी केली.
रुग्णालयातील वेगवेगळ्या फाईल या अधिकाऱ्यांनी तपासल्या. काल अहमदनगर मधील त्या रुग्णालयात टाकलेल्या छाप्यामध्ये अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. त्यामुळे या रुग्णालयावर आता काय कारवाई होते याकडे अहमदनगरकरांचे लक्ष लागले आहे.