Ahmednagar News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर कारवाई केली. एमआयडीसीमधील अभियंत्यावरील लाचेची झालेली कारवाई प्रचंड गाजली होती. दरम्यान आता आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावरील कारवाईने आता खळबळ उडाली आहे.
दरम्यान आता नगरमधील शासकीय ‘स्वराज’ या निवासस्थानाची शुक्रवारी सायंकाळी झाडाझडती झाली होती. आता यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. आयुक्त जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक शेखर उर्फ श्रीधर देशपांडे यांच्याविरोधात बांधकाम परवान्यासाठी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सापळा लावल्याची कुणकुण लागताच हे दोघे फरार झालेले आहेत. दरम्यान, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बांधकाम परवानगी देण्यासाठी आयुक्त जावळे व देशपांडे यांनी आठ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीतून तसे उघडही झाले आहे. ही पडताळणी १९ तारखेला करण्यात आली.
त्यावेळी लाचेची रक्कम २५ जून रोजी स्वीकारण्याचे ठरले होते. तेव्हापासून लाचलुचपतचे पथक आयुक्त जावळे व देशपांडे यांच्या मागावर होते.
असे झाले होते संभाषण
तक्रारदार : देशपांडे साहेब पाचच मिनिटे द्याना राव. तुम्ही आम्हाला थांगपत्ताच लागू देत नाही राव. नऊ
लाख तीस हजार रुपये लई होतेत राव शेखरभाऊ.
देशपांडे : मी आयुक्तांकडे विषय काढला होता. ते आठपर्यंत तयार आहेत.
तक्रारदार : आठ काय, आठ लाख रुपये का? देशपांडे : हा…..
तक्रारदार : लई रक्कम होते शेखरभाऊ. माझ्या नावावर फाईल हे. नऊ लाख तीस हजार रुपये कोणत्या हिशोबाने सांगितले?
देशपांडे : युनिटचे कॅल्क्युलेशन करा.
तक्रारदार : एकशे सोळा युनिट आहेत.
देशपांडे : आता हेच पाच लाख ऐशी होतात.
तक्रारदार : म्हणजे काय युनिट
देशपांडे : दहा..
तक्रारदार : दहा हजार रुपये युनिट लई पैसे होतात. देशपांडे : ते म्हणे मला कळाले की आठ लाख
रुपयेपर्यंत आहे
तक्रारदार : ठीक आहे देऊन टाकतो