Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल कॉलेज व त्या कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचे काळे कारनामे समोर आले व महाराष्ट्र हादरला.
+कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थान व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्च महिन्यात डॉ. भास्कर मोरे याच्याविरुद्ध तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते व त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
डॉ. मोरे याच्याविरुद्ध जामखेड पोलिसांनी विद्यार्थिनींचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याप्रकरणी सत्र न्यायालयात २ मे रोजी दोषारोपपत्र सादर केले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या छळाबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रत्नदीप मेडिकल कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे ठराविक विद्यार्थिनींसोबत रात्री उशिरापर्यंत सोशल मिडियावर चॅटिंग करायचा. याद्वारे विद्यार्थिनींच्या खासगी आयुष्यात डोकावत त्यांचा मानसिक छळ करायचा, अशी माहिती पोलिसांच्या दोषारोपपत्रातून समोर आली आहे.
या प्रकरणी एकूण १२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवून घेतले असून इतर तांत्रिक तपास करुन न्यायालयात २८६ पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. यामध्ये डॉ. मोरे याने विद्यार्थिनींसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट पोलिसांनी दोषारोपपत्रात जोडले आहेत.
‘तुझ्याशी पर्सनल बोलायचे आहे, तुला पर्सनल कळते का’
डॉ. मोरे विद्यार्थिनींच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करायचा व वेशभूषेवरून हिणवायचा. त्यांचे मोबाईल जप्त करुन त्यातील फोटो व डाटा स्वतःच्या संगणकावर सेव्ह करायचा. तुम्ही मुलांसोबत बाहेर फिरता, तुमचे वागणे चांगले नाही, तुमच्या घरी सांगेन, असा दम द्यायचा.
काही मुलींच्या जबाबात त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन मोबाइल परत केल्याचे, तर काही पालकांना कॉलेजात भेटायला बोलावल्याचे म्हटले आहे. एका विद्यार्थिनीला वारंवार ‘तुझ्याशी पर्सनल बोलायचे आहे, तुला पर्सनल कळते का’, असे म्हणायचा.
मुलांनाही दाखवायचा पिस्तूल
२२ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत डॉ. भास्कर मोरे याने फी बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या केबिनमध्ये बोलवायचा. पिस्तुल दाखवत ‘सव्वा लाखाची फी तत्काळ भर, नाहीतर तुझे काय होईल याचा विचार कर’, असे धमकावले होते.
तर दोन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मैदानावर अडवून कमरेला लावलेले पिस्तुल ‘राहिलेली फी भर, नाहीतर तु आहे आणि हे पिस्तुल आहे’, असे धमकावले होते. या ५ विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे लेखी जबाब नोंदवले, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
प्रकरण एका दृष्टीक्षेपात..
यात एकूण 286 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डॉ. मोरे याच्यावर तब्बल 5 गुन्हे दाखल आहेत, 7 विद्यार्थिनींचे मानसिक छळाचे अर्ज आले असून एकूण 23 विद्यार्थिनींचे तक्रार अर्ज आहेत. 12 विद्यार्थिनींचे पोलिसांत जबाब नोंदवले आहेत.