Ahmednagar News : शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या शाळा या विद्येचे महेर घर असतात. परंतु अनेक कॉलेजमध्ये सध्या विद्यार्थी किंवा टारगट तरुण मारहाणीच्या घटना करताना दिसतात. अशीच एक घटना एका नामांकित विद्यालयात घडली आहे.
श्रीगोंदे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.११) महाविद्यालय बंद ठेवीत विद्यार्थ्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. महाविद्यालयांच्या आवारातील अपप्रकारांना आळा घालण्याचीही मागणी केली.
याबाबत पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत गिरमकर यांनी नुकतेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आवारातील अपप्रकार रोखण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर बुधवारी (ता. १०) दुपारी भारत गिरमकर यांना महाविद्यालयाच्या बाहेरील तरुणांनी आवारात येऊन मारहाण केली.
असे प्रकार सतत घडत आहेत. याच्या निषेधार्थ गुरुवारी महाविद्यालय बंद ठेवीत विद्यार्थ्यांनी थेट श्रीगोंदे पोलिस ठाणे गाठले. या वेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी रोडरोमिओंवर कारवाई करून महाविद्यालय परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्याचे आश्वासन दिले.
तर महाविद्यालयाकडून तक्रार पेटीची सुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील अशा अनेक शाळा कॉलेजेस असे आहेत की जेथे टारगट तरुणांचा उच्छाद असतो.
पोलीस प्रशासन बऱ्याचदा यावर वचक ठेवण्याचा प्रयत्नही करते. मुलींसाठी ‘दामिनी’ पथक देखील कार्यरत असते. अशा टारगटांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करतात.