Ahmednagar News : कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; पावसामुळे भाज्यांचे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : गेल्या पाच सहा दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे आठवडाभरात भाजीपाल्याची आवक देखील चांगलीच घटली असून, यामुळे पालेभाज्यांच्या दरात किमतीत चांगलीच वाढ झाली आहे.

अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणात वापरण्यात येणारी कोथिंबीर तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कोथिंबीरच्या एका जुडीला ४० ते ५० रुपये असा दर मिळत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे किमान महिनाभर तरी पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याचे जाणकार सांगतात.

मागील वर्षी खरीप व रब्बी हंगाम सपशेल फेल गेल्याने शेतीशी निगडित सर्व व्यवसायिक मेटाकुटीला येऊन आर्थिक संकटात आले होते; मात्र आता मृग नक्षत्र सुरुवातीस वेळेत चालू झाल्याने या व्यवसायिकांनाही चालना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनच्या पावसाने राज्यासह जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मागील चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसासोबत वादळी वाऱ्याने देखील हजेरी लावली.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झाली. परिणामी कोथिंबीर सर्वात महाग झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात देखील वाढ झाली.

किरकोळ बाजारात कोथिंबरीच्या एका जुडीच दर ५० रुपये आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पालेभाज्या लागवडीस किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे नवीन भाजीपाला बाजारात येण्यास आणखी काही कालावधी लागेल. वाढत्या महागाईमुळे मात्र गृहिणींना रोजचे जेवण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

नगर बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ५०० – ३५००, वांगी ५०० – ३०००, फ्लावर १००० – ५०००, कोबी ६०० – २०००, काकडी ८०० – २५००,
गवार २५०० – ७०००, घोसाळे १००० – ४०००,दोडके १५०० – ६५००, कारले ४००० – ६०००, भेंडी १००० – ४५००,वाल ५००० – ५५००, घेवडा १२००० – १४०००, बटाटे ९०० – ३५००, लसूण ५००० – १८०००, हिरवी मिरची ३००० – ६०००, शेवगा ३००० – ७०००, भु. शेंग २५०० – ४५००, लिंबू २००० – ६०००, गाजर १००० – २६००, दू. भोपळा ५०० – २०००, शि. मिरची २००० – ५५००, मेथी १२०० – ३०००, कोथंबीर ४००० – १०५००, पालक १६०० – ३०००, शेपू भाजी २४०० – ४०००, चवळी ४५००, बीट १५०० – २५००.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe