Ahmednagar news : दवाखान्यात येऊन डॉक्टरलाच दमबाजी करत खंडणीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ.निलेश श्रीनिवास मंत्री यांनी फिर्याद दाखल केली आहे. अविनाश देशमुख ( रा.शेवगाव), सचिन ताराचंद अभंग, अविनाश बाबासाहेब बुटे व शुभम शंकर अभंग, सर्व (रा. हातगाव, ता.शेवगाव), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत डॉ.मंत्री यांनी नमूद केले आहे की, दि.३१ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास मी दवाखान्यामध्ये काम करत असताना अविनाश देशमुख यांनी मला फोन करून सचिन ताराचंद अभंग यांच्याबाबत माहिती मागितली असता, मी अविनाश देशमुख यांना जी सत्य माहिती आहे ती सांगितली. मात्र, त्याच दिवशी रात्री ९ वा. च्या दरम्यान आदर्श हातगाव, या मोबाईल ग्रुपवर मी शेवगावकर पत्रकार, या नावाने मी दिलेली व अविनाश देशमुख यांनी काही स्वतः च्या मनाने बदल करून तयार केलेली माहिती प्रसारित केली.

प्रसारित झालेल्या माहितीचा मॅसेज माझ्या मोबाईलवर रंजना पाटील नावाने पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पुन्हा देशमुख यांनी मॅसेज करून तुम्ही मला माहिती देणार होते, त्याचे काय झाले, असे विचारले असता, मी त्यांना म्हणालो, तुम्ही तर रात्रीच माहिती मोबाईल ग्रुपवर प्रसारीत केली आहे, असे म्हणताच त्यांनी मला काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर अविनाश देशमुख यांनी सचिन ताराचंद अभंग व अविनाश बाबासाहेब बुटे यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा शुभम शंकर अभंग, या व्यक्तीची भेट घेऊन मोबाईलवरील माझ्या संभाषणाची रेकॉर्डिंग त्यास दाखवून संगणमताने माझ्या विरोधात बदनामीकारक, अशी माहिती पुन्हा मोबाईलवर प्रसारीत केली, ही प्रसारित झालेली माहिती सचिन अभंग व अविनाश बुटे यांनी स्टेटसला ठेवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ही बाब मला सहन न झाल्याने मी शेवगाव पोलीस स्टेशनला वरील चार व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.