Ahmednagar News : ज्याने चोच दिली तोच खाण्यापिण्याची सोय करतो अशी एक म्हण आपल्याकडे आहे. याचा एक प्रत्यक्ष अनुभव अहमदनगरमध्ये आलाय.
वाढत्या उष्णतेने व पाणी आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण होऊ नये यासाठी कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जंगलात जेसीबीच्या साह्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरु होते. हे काम करत असतानाच
या जंगलात जमिनीपासून ५ फूट खोलीवर पाण्याचा झरा आढळून आला. भर उन्हाळ्यात पाण्याचा झरा आढळून आल्याने या परिसरातील वन्य व मुक्या प्राण्यांची सोय झाली आहे.
मिरजगाव येथे ग्रामपंचायत मालकीचे नोंद असणाऱ्या २०० एकर जमिनीवर गायरान फॉरेस्ट आहे. या ठिकाणी वनक्षेत्र विभाग व मिरजगाव ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे हजारो वृक्ष लागवड केली आहे. यातच माझी वसुंधरा अभियान टप्पा क्र.४ अंतर्गत भूमी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंच तत्त्वावर काम सुरु होते.
ग्रामपंचायत मिरजगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्वे नंबर ३४४ मध्ये ७५ हेक्टर क्षेत्र आहे. तेथे विविध वृक्ष आहेत. या क्षेत्रात हरिण, काळवीट, ससा, लांडगा, खोकड, कोल्हा असे वन्य प्राणी आढळून येतात.
त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मिरजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जेसीबीच्या साह्याने कृत्रिम पाणवठे तयार करत असताना या जंगलात जमिनीपासून ५ फूट खोलीवर पाण्याचा झरा आढळून आला.
त्या ठिकाणी नैसर्गिक पाणवठयाची निर्मिती करण्यात आली. तालुक्यामध्ये या उन्हाळ्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्यासाठी अनेक गावांची वण वण होत आहे.
परंतु या जंगलातील वन्यप्राण्यांची सोय निसर्गानेच केल्याने भर उन्हाळ्यामध्ये मुक्या प्राण्याची पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे हा विषय पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे.