Ahmednagar News : केंद्र सरकार पर्यावरण पूरक अनेक कार्यक्रम करत असते. त्याबाबत योजना देखील आखत असते. त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीनेही अनेक कामे करत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्राने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अॅण्ड अर्बन अफेअर्स मंत्रालयांतर्गत पीएम ई- बस सेवा योजना सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत नगर शहराला मोठा फायदा होणार आहे. केंद्राकडून नगरसाठी तब्बल ९ मीटर लांबीच्या ४० इलेक्ट्रिक बस देण्यात येणार आहेत. सध्या नगर शहरात खासगी ठेकेदारामार्फत मनपा बससेवा चालवित असून १५ बस आहेत.

मात्र, यातील बहुतांशी बस या जुनाट झाल्याने सर्व बस शहरातील रस्त्यांवरून धावत नाहीत. इलेक्ट्रिक बस आल्यानंतर नगरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
पीएम ई-बस योजनेंतर्गत नगर शहरासाठी केंद्र शासनाकडून ४० इलेक्ट्रिक बस मंजूर झालेल्या आहेत. केडगाव येथे बस डेपो तयार करण्यात येणार असून या कामासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच बसेसला चार्जिंग करण्यासाठी महावितरणकडून वीजवाहिनी टाकून दिली जाणार आहे.
हे दोन्ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर ही सेवा कार्यन्वित होणार असल्याची माहिती संबंधित अधिकारी परिमल निकम यांनी दिली आहे.
कोठे असेल डेपो?
या बससाठी केडगाव येथे बस डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिक बस शहरातून धावणार आहेत.
केडगाव येथील सर्व्हे नंबर २०६ याठिकाणी बस डेपो प्रस्तावित असून या कामासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. या डेपोपर्यंत वीजवाहिनी टाकून देण्याची जबाबदारी महावितरणची आहे.
चालकही थेट केंद्राकडूनच येणार
शहरात इलेक्ट्रिक बससेवा कार्यन्वित झाल्यानंतर त्या चालविण्यासाठी जे चालक लागतील ते देखील केंद्राकडूनच येतील. चालकांची नियुक्त्ती केंद्राकडूनच होईल.













