शेतकरी ब्रँड ! अहमदनगरमधील शेतकऱ्याच्या बैलाची 9 लाख रुपयांना विक्री

शेतकरी हा काहीही करू शकतो. सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नको असे देखील गमतीने म्हटले जाते. आता अशाच एका नादखुळा शेतकऱ्याची एक नादखुळा बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील या शेतकऱ्याच्या बैलाची तब्बल नऊ लाख २१ हजार रुपयांना विक्री झाली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
baji

Ahmednagar News : शेतकरी हा काहीही करू शकतो. सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नको असे देखील गमतीने म्हटले जाते. आता अशाच एका नादखुळा शेतकऱ्याची एक नादखुळा बातमी समोर आली आहे.

अहमदनगरमधील या शेतकऱ्याच्या बैलाची तब्बल नऊ लाख २१ हजार रुपयांना विक्री झाली आहे. अमोल चंद्रकांत कोरडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेवगाव शहरालगतच्या वरूर रस्त्यावरील कोरडे वस्ती येथील हे रहिवासी आहेत. त्यांच्या बाजी नावाच्या बैलाने त्यांना लखपती बनविले आहे.

त्याची तब्बल नऊ लाख २१ हजार रुपयांना विक्री झाली आहे. बैल म्हटले, की आपल्या नजरेसमोर येते उसाची वाहतूक करणारी बैलगाडी, बैलाची झालेली दमछाक. मात्र अमोल कोरडे यांनी दोन वर्षापूर्वी शेवगाव आठवडे बाजारात अवघ्या ५० हजार रुपयात आदत खोंड खरेदी केला.

छंदापायी आपल्या घरच्या पवन नावाच्या घोड्यासोबत बैलगाडा शर्यतीचे त्याला प्रशिक्षण दिले. त्याच्या तब्येतीसाठी त्यांनी उडीद डाळ, मका भरडा आणि प्रति दिवस सहा लिटर दूध, असा पोषक आहार देत बाजीला तंदुरुस्त व तरबेज केले.

बाजीने तालुक्यातील व ग्रामीण भागातील शर्यती जिंकत बैलगाडा रसिकाचे मन वेधून घेतले. सरपंच केसरी, सलाबतपूर केसरी, मावळ केसरी, असे विविध पुरस्कार त्याने प्राप्त केले. यामधून बाजी महाराष्ट्राभरातील बैलगाडाप्रेमींच्या मनामनात भरला. मावळ केसरीच्या विजयानंतर लोणावळा येथील आशिष पडोळकर यांनी बाजीला खरेदीसाठी शब्द टाकला.

अमोल कोरडे यांनी होकार देत बाजी ९ लाख २१ हजाराला देण्यात आला. बाजी आर्थिकदृष्ट्या त्यांना सुखावून जात असला तरी त्यांच्या डोळ्यात मात्र बाजीला देताना अश्रू दाटून आले होते. पडवळकरांनी बाजीची शेवगाव शहरात वाजत गाजत मिरवणूक काढली. कानिफनाथ देवस्थान मढी, एकवीरा आईचे दर्शन घेत बाजीला लोणावळा येथे घेऊन गेले.

दरम्यान, अमोल कोरडे सांगतात वडील हे बैलगाडी हमाल व्यवसाय करत होते. त्यामुळे बैलाचा छंद हा आमचा पारंपरिक आहे. आम्ही बैलगाडी शर्यतीकडे वळलो. त्यातूनच दिवसेंदिवस आमची बैलगाडा शर्यतीची ओढ वाढत गेली. बाजीने आमच्या नावाचा नावलौकिक वाढवत आर्थिक सधन केले असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe