Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे रात्रीचे लिलाव होतात. आता अहमदनगरमधील एका बाजार समितीने रात्रीचे लिलाव रद्द करत ते पहाटे पाच वाजता घेण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीरामपूर येथील बाजार समितीने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी रात्री दोन ते अडीच वाजता हे लिलाव पार पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मालवाहतूक करताना अनेक अडचणी येत होत्या.
सभापती सुधीर नवले, सचिव साहेबराव वाबळे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, मनोज हिवराळे यांनी शुक्रवारी पहाटे भाजीपाला बाजाराला भेट दिली. यावेळी व्यापारी हमाल उपस्थित होते. सर्वांनी एकमताने लिलाव पहाटे सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्याचे सर्व शेतकऱ्यांनीही स्वागत केले. शुक्रवारपासून पहाटे साडेचार वाजता समितीचे प्रवेशद्वार खुले केले गेले. त्यानंतर वाहने आत दाखल झाली. हमालांनी सर्व वाहनातील माल खाली उतरून घेतला.
त्यानंतर पहाटे पाच वाजता लिलाव पार पडले. संचालक मंडळाने सर्व गोष्टींची पाहणी केली. यापूर्वी रात्री दोन ते अडीच वाजता लिलाव केले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यरात्री आपला माल विक्रीसाठी आणावा लागत होता.
त्यात चोरीचा तसेच अपघाताचा मोठा धोका होता. शेतकऱ्यांबरोबच व्यापारी, हमाल यांचेही आरोग्य त्यामुळे खराब झाले होते, असे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले. नगर, नाशिक, जालना, पुणे जिल्ह्यातून येथे भाजीपाल्याची आवक होते.
तेथील व्यापारी, तसेच वाहतूकदार यांचीही तारेवरची कसरत सुरु होती. मध्यरात्री होणाऱ्या लिलावामुळे त्यांची पुरेशी झोप होत नव्हती. त्यामुळे संचालक मंडळाकडे पहाटेच्या वेळी लिलाव घेण्याबाबत विनंती करण्यात आली होती.
त्याची दखल घेण्यात आली. या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनीही स्वागत केले आहे.