Ahmednagar News : नगर-सोलापूर रस्त्यावरील घोगरगाव शिवारात भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झालेत. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात झाला.
कंटेनर-मोटारकार व दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यामध्ये शेखर नवनाथ मिसाळ (वय ३४), राजेश बबन थोरात (वय २६) हे मृत झाले. हे दोघे अंभोरा (ता. आष्टी) येथील होते.

याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेखर व राजेश राशीनला जात होते. ते घोगरगाव शिवारात बाह्यवळण रस्त्यावर भोस वस्ती चौकात आले तेव्हा तेथे कंटेनरने एका मोटारकारला धडक दिली.
कार बाजूला जाऊन पडली. कंटेनरने पुढे जात या दुचाकीला जोराची धडक दिली. दोघे तरुण शंभर फुटांवर जाऊन पडले. अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. त्यांनी मदत कार्यही सुरु केले होते.
घोगरगावचे सरपंच सागर आमले, पोलिस पाटील सुदाम बोरूडे, विकी तरटे, शिवाजी वाघ, दत्तात्रय भोस, दत्ता तरटे, पप्पू बेरड यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
त्या शेखर मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. राजेश थोरात याचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. दोघांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली होती.
अहमदनगर जिल्ह्यातून अपघातांची संख्या वाढल्याचे दिसते. मागील काही दिवसांचा विचार जर केला तर ही संख्या लक्षणीय दिसते.
यातील मृतांचेही प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे वाहने चालवताना सावधगिरी बाळगणे फार गरजेचे झाले आहे.