Ahmednagar News : नेवासे तालुक्यातील वडुले येथील प्रसाद दिनकर गर्जे या वकिलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फरार आरोपीला नेवासा पोलिसांनी नुकतेच जेरबंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाधव यांनी म्हटले आहे की, दि.२ डिसेंबर २०२३ रोजी वकील प्रसाद दिनकर गर्जे यांनी दिलेल्या जबाबावरुन नेवासा पोलीस स्टेशन येथे ८ आरोपी व एका बालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील प्रभाकर एकनाथ गर्जे, वसंत एकनाथ गर्जे,

गीता प्रभाकर गर्जे, शितल वसंत गर्जे, सिताबाई एकनाथ गर्जे रंजना अर्जुन आतकरे यापैकी ६ आरोपी नेवासा पोलिसांनी अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यातील आरोपी एकनाथ महादु गर्जे व अर्जुन मच्छिद्र आतकरे (दोन्ही रा. वडुले ता. नेवासा) हे फरार होते. पोलीस त्यांचा वेळोवेळी त्यांच्या गावात नातेवाईकांकडे तसेच इतर संभाव्य ठिकाणी शोध घेतला असता ते मिळुन येत नव्हते.
आरोपींविरुद्ध स्टॅण्डींग वारंट काढुन, कलम ८२ प्रमाणे आरोपीचा जाहीरनामा प्रसिद्ध करुन कलम ८३ अन्वये फरार आरोपींची स्थावर मालमत्ता जप्त होण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी एकनाथ महादु गर्जे पोलीस स्टेशनला हजर झाला; परंतु अर्जुन मच्छिद्र आतकरे कायद्याला न जुमनता फरार राहीला.
त्याला पकडण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांनी सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी एक तपास पथक तयार केले. दि.२१ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना फरार आरोपीच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने तपास पथक रवाना झाले.
तपास पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे भातकुडगाव शिवार (ता. शेवगाव) येथे मोठ्या चतुराईने सापळा रचून सुमारे ७ महिन्यापासून फरार आरोपी अर्जुन मच्छिद्र आतकरे याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
तपास अधिकारी उपनिरीक्षक मनोज अहीरे यांनी आरोपीला अटक केली असून आज रविवारी दि.२३ त्यास येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.