अखेर भंडारदऱ्याच्या पाणलोटात जोरदार पाऊस ! धरणात आले ‘इतके’ पाणी

अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला रविवारी जोरदार पावसाने झोडपले आहे. आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरलेली दिसुन येत आहेत.

Pragati
Published:
bhandaradara

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला रविवारी जोरदार पावसाने झोडपले आहे. आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरलेली दिसुन येत आहेत.

शनिवार व रविवारचे औचित्य साधत अनेक पर्यटकांनी भंडारदऱ्याच्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे पावसाचे माहेरघर समजले जाते.

शुक्रवारी मध्यरात्री भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह सर्वत्र मान्सूनचे जोरदार आगमन झाले. सुरुवातीला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या; परंतु आता पाऊस वाढला असुन सर्वत्र जोरदार कोसळत आहे.

घाटघर, रतनवाडी, साम्रद परिसरात पावसाचे तांडव सुरू होते. जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे डोंगरदऱ्यावरून ओढून आले वाहते झाले आहेत. डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याचे धबधब्यांमध्ये रूपांतर झाल्यामुळे पर्यटकांचे थवे ही भंडारदऱ्याकडे आकर्षित झाले आहेत.

अनेक पर्यटकांनी भंडादऱ्याच्या पहिल्याच पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला असून पर्यटकांनी कोलटेंबे येथील वसुंधरा फॉल, बाहुबली धबधबा तसेच सांदणदरीचा रिव्हर्स धबधबा पाहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. भंडारदरा धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे त्याही ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसुन आली.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस टिकून असल्याने आदिवासी बांधवांची भातखाचरे तुडुंब भरली असून शेतकरी मशागतीच्या कामाला जोमाने लागला आहे. लवकरच या भागात भात लागवडीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. कळसुबाई शिखरावरही पाऊस सुरूच असून कृष्णावंती नदीही वाहती झाली आहे.

रतनवाडीची अमृतवाहिनी समजली जाणारी प्रवरा नदी वाहती झाल्याने भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. गत २४ तासांमध्ये भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १५५० दशलक्ष घनफूट झाला असून भंडारदरा धरणामध्ये ७१ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.

संध्याकाळी सहा वाजता भंडारदरा येथे १५ मी.मी. पावसाची नोंद झाली. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १६८४ दशलक्ष घनफुटावर पोहोचला होता.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील गावांची पावसाची आकडेवारी धरण शाखेकडून उपलब्ध होऊ शकली नाही. भंडारदरा धरणामधून १०४० क्युसेकने प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe