Ahmednagar News : मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा चिमुरडा जखमी, आठ ठिकाणी चावा, नागरिकांचा रोष तर मनपाला कुत्रे पकडण्यास ठेकेदारच मिळेना

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न नेहेमीच ऐरणीवर आलेला दिसतो. आता ही कुत्री बालकांवरही हल्ले करू लागल्याचे चित्र आहे. नगर शहरातील तवले नगर येथील परिसरात घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरड्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केलाय.

तब्बल आठ ठिकाणी चावा घेतला असून यात ते बालक गंभीर जखमी झालेय. शिवार्थ शेखर डहाके (वय ५) असे याचे नाव असून गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. कुत्र्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करताना नाकावर, गालावर, कानावर तसेच हाता-पायावर आठ ठिकाणी चावा घेतला.

त्याचे वडील शेखर डहाके यांनी पळत येऊन कुत्र्याला उचलून फेकले व बालकाला उचलल्याने तो वाचला. दरम्यान, गेल्या सात महिन्यांपासून महापालिकेचा मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेकाच कोणाला दिला नसल्याने उपाययोजना ठप्प आहेत. तवलेनगर परिसरात शिवशंभू गृहनिर्माण सोसायटी आहे. तेथे निवृत्त सहायक फौजदार सुरेश डहाके यांचा बंगला आहे. या बंगल्यासमोर त्यांचा नातू शिवार्थ शेखर डहाके अन्य लहान मुलांसमवेत खेळत होता.

अचानक पाच-सहा मोकाट त्यांच्या दिशेने पळत आले व त्यापैकी एकाने शिवार्थवर हल्ला केला. त्याच्या गालावर व नाकावर चावे घेतले तसेच कानावर व हाता-पायावरही चावा घेऊन लचके तोडण्याचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने शिवार्थ ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून वडील शेखर डहाके घावत आले

व त्यांनी शिवार्थवर हल्ला केलेल्या कुत्र्याला उचलून फेकून दिले व शिवार्थला उचलून घेतले. त्याच्या गालातून, कानातून व हाता-पायातून रक्त वाहू लागल्याने त्यांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

कुत्रे पकडण्यासाठी मनपाला मिळेना ठेकेदार
शहरात कुत्रे पकडणारी यंत्रणा गेल्या आठ महिन्यांपासून ठप्प आहे. मनपाने या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली मात्र, हे काम करण्यासाठी ठेकेदार संस्थाच मिळेना. महापालिकाही यातून काही मार्ग काढताना दिसत नाही. त्यामुळे कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण ठप्प आहे. अशा स्थितीत मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या कुत्र्यांचा नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe