Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे (शिंदे गट) माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला. असे धक्कादायक विधान केले होते. यानंतर मात्र त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आल्याने माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी ‘यु टर्न’ घेतला असून, आपल्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे माजी खासदार लोखंडे यांनी सांगितले.
एका पत्रकार परिषदेत लोखंडे बोलत होते. ते म्हणाले, राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला, असे वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले; परंतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यातील एका संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अप्रचार, यामुळे अपला पराभव झाला असे आपण वक्तव्य केले होते.

मात्र माझ्या या वाक्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आपण कारसेवक असून राम मंदिरासाठी जो लढा देण्यात आला, त्यात आपण प्रामुख्याने सहभागी झालो होतो. सन १९९० मध्ये सोमनाथ ते आयोध्या जी रथ यात्रा काढण्यात आली होती, या यात्रेचा रथ चेंबुर येथे तयार करण्यात आला होता.
यावेळी त्याची जबाबदारी आमचे नेते हाशु आडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पार पाडली होती.त्याचबरोबर संबधित रथ सोमनाथ मंदिरापर्यंत पोहोचवण्याचे कामदेखील दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपचा वार्ड अध्यक्ष म्हणून पार पाडली होती. तसेच १९८९ साली शिला पुजनाचे आंदोलन झाले, देशभरातून प्रत्येक गावातून विटांचे पूजन करून सर्व विटा आयोध्या येथे पोहचवल्या.
या शिला पूजनाच्या अभियानाचादेखील मी प्रमुख होतो. १९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशिद पाडली, तेव्हादेखील मी त्या कारसेवेला आयोध्येत होतो.मी एकटाच गेलो नाही, तर मी माझ्या वार्डातील शेकडो कारसेवक तेथे नेले होते.
मी बालपणापासून संघाचा स्वंयसेवक आहे. हिंदुत्व माझ्या रक्तात आहे. आमचा डीएनए कधीही बदलणार नाही. आम्ही आमचे आयुष्य राम मंदिरासाठी खर्च केलेले आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सत्ता महत्त्वाची नसून राम मंदिर महत्वाचे असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की, राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला, त्यावर मी अकोले तालुक्यातील एका संघटनेचा उल्लेख केला. ही संघटना हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अपप्रचाराचे करत आहे.
त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचेही लोखंडे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.













