Ahmednagar News : मुळा धरणाने आज सोमवारी २२ हजार ८०० दलघफूचा पाणी साठ्याचा टप्पा ओलांडला. मुळा धारण हे तांत्रिकदृष्ट्या भरले आहे.
जलाशय परिचलन सुचीनुसार कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते वक्री दरवाज्यांचे कळ दाबत तीन इंचाने उघडण्यात आले. ११ दरवाजे उघडताच जलोत्सारणीत २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात झेपावले.

पाणी सोडतानाचे विहंगम दृष्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये २२ हजार ८३३ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा स्थिर आहे.
धरणाकडे कोतूळ येथून १ हजार ७५३ क्युसेकने आवक सुरू आहे. मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार १ ते १५ ऑगस्ट दरम्यान २२ हजार ८१४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे सोमवारी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल.
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुळा धरण ५२ वर्षांत १७ वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. तर ३५ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने धरण भरण्याची ही ३६ वी वेळ असेल.
समन्यायी’ची तलवार चार वेळा कोसळली
समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाल्यानंतर जायकवाडी पाणी साठ्याबाबत अडचणीत आल्यानंतर मुळातून चार वेळा पाणी सोडण्याची वेळ आली. २०१४, २०१८, २०१९ व २०२३ मध्ये समन्यायीची तलवार कोसळत मुळातून जायकवाडीला पाणी सोडण्याची नामुष्की ओढावली होती.
यंदा समन्यायीनुसार धरणातून पाणी सोडावे लागू नये यासाठी जायकवाडी धरण भरावे अशी प्रार्थना केली जात आहे. मुळातून जायवाडीला धरणाला २ हजार क्यूसेकने पाणी सोडले जात आहे.