Ahmednagar News : चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांच्या टोळक्याने तरुणाला शिवीगाळ करीत भावाला हत्यार, वस्तरा व लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत मासूम हुसेन पठाण हा जखमी झाला आहे. त्यांचा भाऊ सलमान हुसेन पठाण (दोघे रा. नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय हंपे, प्रतिक लालबोद्रे (पूर्ण नावे नाही, दोघे रा. भिंगार) व दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (४ जून) सायंकाळी सातच्या सुमारास सलमान नागरदेवळे रस्त्यावरून घराकडे जात असताना अक्षय हंपे व त्याच्यासोबत अन्य तिघे चारचाकी वाहनातून आले. त्यांनी सलमानजवळ येऊन ‘तुझ्याकडे पाहावेच लागेल, तुझे लई झाले आहे’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
सलमान घराकडे पळाला असता, ते चौघे त्याच्या पाठीमागे आले. तेथे मासूम होता त्याला ‘तुझा भाऊ कुठे आहे’ अशी विचारणा केली. त्याने माहिती नाही असे सांगताच अक्षयने हत्याराने मासूमला मारहाण केली. प्रतिकने वस्ताऱ्याने मारहाण करून दुखापत केली. तसेच दोन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सलमानच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. नगर शहरातील विविध घडामोडी पाहता टोळीयुद्ध, मारहाण आदी प्रकार सातत्याने घडले असल्याचे चित्र आहे.