Ahmednagar News : देशातील नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे संस्थानमध्ये दहा वर्षांपासून जे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात येणार आहे. तसा आदेश देण्यात आला. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे व आर. एम. जोशी यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
साईबाबा संस्थानमध्ये गेल्या बावीस ते तेवीस वर्षांपासून विविध विभागात काम करत असलेल्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कायस्वरुपी ऑर्डर मिळण्यासाठी शासनाकडे, राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ठेवली होती. तर दुसरीकडे न्यायालयात सुध्दा धाव घेतली होती . मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन २०२१ मध्ये याचिका केली. त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केले.
९ मे रोजी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे व आर. एम. जोशी यांनी या याचिकेवर संस्थानमध्ये दहा वर्षांपासून जे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे,असा आदेश दिला. तसेच या आदेशाची अंमलबजावणी १२० दिवसात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असून या निकालामुळे १९०० कामगारांचे कल्याण होणार आहे. या निकालानंतर कामगार विभागातून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
गेल्या बावीस ते तेवीस वर्षांपासून कायमस्वरूपीची ऑर्डर मिळावी, यासाठी अनेक कामगारांनी संघर्ष केला. अनेक आंदोलने झाली, दुर्दैवाने हे स्वप्न उराशी बाळगणारे काही कर्मचारी देवाघरी गेले. यात फक्त ५९८ कंत्राटी कामगारांना आशा होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळताना १९०० कर्मचाऱ्यांचे कल्याण होणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन महिन्यात यासर्व १९०० कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.