Ahmednagar News : अकोले तालुक्यातील मुळा नदी खोर्यातील अंबीत व पिंपळगावखांड लघु जलाशय भरल्यानंतर शुक्रवारी (५ जुलै) सकाळी ६ वाजता प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीवरील ११२.६६ दलघफू क्षमतेचे वाकी जलाशय भरले. या पावसाळ्यात भरलेले वाकी ३ रे जलाशय आहे.
शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाकी जलाशयाच्या सांडव्यावरून १९७ क्युसेक्सने ओव्हर फ्लो (विसर्ग) कृष्णावंती नदीपात्रात झेपावला. नगर दक्षिणेचा तारणहार असलेल्या मुळा धरणात धरणाकडे नविन पाण्याची आवक सुरु झाली.

४ हजार क्यूसेकने लहित खुर्द येथील मुळा नदी धरणाकडे वाहती असून २४ तासानंतर नविन पाणी धरणात जमा होणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे प्रशासनाने दिली. जोरदार वृष्टी कोसळत असल्याने सायंकाळी पुन्हा लहित खुर्द येथील मुळा नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली. सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाच्या दिशेने ४ हजार २२७ क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक होत होती.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून धरण साठ्यापर्यंत पाणी येण्यास उशिर लागणार आहे. नदी पात्रातील खड्डे पूर्ण भल्यानंतर धरण साठ्यात वाढ होणार आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण भरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत. पाणलोट क्षेत्रावर दमदार पावसाच्या हजेरीची प्रतिक्षा बळीराजासह सर्वांना लागली आहे.
मुळा धरणामध्ये जीवंत पाणी साठा केवळ ६ टक्के शिल्लक आहे. पाटबंधारे प्रशासनाने जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन केलेले आहे. २६ हजार दलघफू पाणी क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये एकूण ५, ९६३ दलघफू इतकाच साठा शिल्लक आहे.
यापैकी ४, ५०० दलघफू मृत साठा वगळता केवळ १, ४६३ दलघफू पाणी उपयुक्त आहे. धरण लाभक्षेत्रावर पावसाच्या अधून-मधून सरी कोसळतात, मात्र सातत्यपूर्ण पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
निळवंडेतही पाणी
गुरुवारी सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने वाकी तलाव शुक्रवारी ५ जुलैला सकाळी ६ वाजता ओव्हरफ्लो झाला. या प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी प्रवरा नदी पात्रातून निळवंडे धरणात जमा होत आहे. यामुळे भंडारयासह आता निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्यास मदत होईल.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काहीकाळ उसंत घेतली, पण पावसाने पुन्हा संततधार सुरू केली. मागील २४ तासांत तालुक्यातून झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये : अकोले ५ (एकूण २५३), भंडारदरा २६ (३०४), घाटघर ५३, पांजरे ४०, निळवंडे ८ (३००), आढळा ० (एकूण १८६ मिमी) असा पाऊस झाला आहे.