Ahmednagar News : नातवावर आजी आजोबांचा प्रचंड जीव असतो. नातवाचा पहिला मित्र / मैत्रीण आजी आजोबा असतात. तर आजी आजोबांचा शेवटचा मित्र / मैत्रीण आपली नातवंडे असतात. दरम्यान आजी आपल्या नातवासाठी काहीही करू शकते याचे एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात घडले आहे.
आपली नात पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आजीने जीवाची पर्वा न करता हौदात उडी घेतली. तसेच पाण्यात बुडालेल्या नातीला शोधून वर काढले. या धाडसाबद्दल आजीचे कौतुक होत आहे. ही घटना घडलीये बोधेगाव येथील घोरतळे गल्लीत. या शूरवीर आजीचे नाव आहे सुनीता गादे.

तर त्याचे झाले असे की, बोधेगाव येथील घोरतळे गल्लीत आशाबाई घोडके कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये सात बाय सात आणि आठ फूट खोल पाण्याचा हैद आहे.
हौदातील पाणी गच्चीवरील पाण्याच्या टाकीत सोडण्यासाठी आज सकाळी अकराच्या सुमारास घोडके यांनी हौदावरील फायबरचे झाकण अर्धवट बाजूला सारून त्यांनी पाण्याची मोटार सुरू केली. मोटारीला पाईप व वायर जोडणे, या गडबडीत त्यांच्याकडून पोर्चमधील ग्रीलचा छोटासा दरवाजा उघडा राहिला.
परंतु याच दरम्यान तीन वर्षीय ईश्वरी रोहित गादे ही चिमुरडी अर्धवट झाकणावर पाय पडल्याने हौदात पडली. हौदात काहीतरी पडण्याच्या आवाजाने घोडके यांनी तत्काळ हैदाजवळ येऊन पहाताच ईश्वरी पाण्यात पडल्याचे लक्षात आले.
त्यांनी आरडाओरड केल्यानंतर रस्त्याच्या समोर उभ्या असलेल्या ईश्वरीच्या आजी सुनीता गादे धावत आल्या व त्यांनी हौदात उडी घेतली. पाण्यात चिमुरडीचा शोध घेऊन तिने तिला पाण्याबाहेर काढले.
यावेळी आजीला हाताला थोडी दुखापत झाली. परंतु नातीच्या जीवापुढे त्याचे दुःख तिला नव्हते. गेल्या दोन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. घोरतळे गल्लीतील अनिल कुंडलिक घोरतळे यांच्या घरासमोरील हौदात त्यांचा मुलगा रामकृष्ण हौदात पडल्याचे पाहुन त्याच्या आईने त्याचा जीव वाचवला होता.