Ahmednagar News : बिबट्याचे हल्ले व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याचीच झालीये. अनके ठिकाणी शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागत आहे तर अनेक ठिकाणी चिमुकले मुलेही शिकार होत आहेत.
त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी हा जीव मुठीत धरून राहतात अशी स्थिती आहे. आता एका शेतकऱ्यांसोबत घडलेला थरार समोर आला आहे. रात्री चारचाकी वाहनातून पोल्ट्री फार्मकडे निघालेल्या तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार श्रीरामपूमधील ऐनतपूर शिवारात घडला.
बिबट्याच्या पंजाने तरुणचा टी शर्ट फाटला. हाताला वरखडा लागला आहे. या थरारक प्रसंगातून गायकवाड याने न घाबरता वाहन पुढे नेले, अन्यथा त्याच्या जीवावर बेतले असते. ऋषीकेश संदीप गायकवाड (एनतपूर, ता. श्रीरामपूर) असे जखमी तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
विशेष असे की, रात्री पुन्हा याच बिबट्याने या भागात अरुण नारायण शेळके यांच्या शेळीचे नरडे फोडले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋषीकेश गायकवाड रात्री चार चाकी वाहनातून पोल्ट्रीकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
या घटनेची माहिती समजताच वनरक्षक बडे घटनास्थळी दाखल झाले. माहिती घेवून अहवाल त्यांनी वरिष्ठांना कळविला आहे. या भागात मागील काही काळात बिबट्याने २-३ कुत्रे मारले. या भागात वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून, बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
चिमुरड्यांचाही घेतलाय बळी
श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर या भागात बिबट्याचे हल्ल्याचे प्रमाण जास्त आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक लहान मुलांनीही जीव गमावला असल्याचे वास्तव आहे.