Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आहे.
रविवारी रात्री ५२ हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी सकाळी सहा वाजता ६२ हजार आणि नऊ वाजल्यापासून ६९ हजार ३६७ क्युसेक करण्यात आले.
नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पात्राबाहेर पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव शहरातील छोट्या पुलाला हे पाणी खेटले आहे.
प्रवरेचेही रौद्ररूप
दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरू असून धरणाच्या परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पानलोटामध्ये गत दोन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.
भंडारदरा धरण शाखेकडून भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची अधिकृत घोषणा दोनच दिवसापूर्वी करण्यात आली होती. अतिरीक्त पाणी भंडारदरा धरणाच्या सांडव्यामधून प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
रविवारी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाच्या सांडव्यामधून १४ हजार १८९ क्युसेसने विसर्ग सुरु असुन निर्माण केंद्रातून ८३० क्युसेक तर अम्ब्रेला
धबधब्यामधून २२० क्युसेक असा एकूण १५ हजार २३९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.