Ahmednagar News : शहर परिसराला शुक्रवारी (दि. २३) रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला होता, कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने पहाटेपासून या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. पावसाचे हे पाणी नागरिकांच्या घरातही घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरु आहे. शुक्रवारी (दि.२३) दुपारी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच होती. रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
रात्रभर अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले होते. त्यामुळे नागरिकांना रात्र अक्षरशः जागून काढावी लागली,
शहर परिसरात तसेच जेऊर परिसरातही रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुरामुळे कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.
सावेडी, नागापूर, जेऊर, चिचोंडी मंडलात अतिवृष्टी
या मुसळधार पावसामुळे शहर परिसरातील सावेडी, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील या ४ मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावेडी मध्ये ८३.८ मिमी, नागापूरमध्ये १०२.३ मिमी, जेऊर १३० मिमी, चिचोंडी पाटील मध्ये ८४.८ मिमी अशी नोंद झाली आहे.
जिल्ह्यात ४ तालुक्यात झाली अतिवृष्टी
नगर शहर परीसरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी रात्री कुठे मुसळधार तर कुठे उगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे नगर, जामखेड पाथर्डी व कोपरगाव या ४ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामध्ये नगर ६३.७ मिमी, जामखेड ६६.७ मिमी, पाथर्डी ७२.६ मिमी, कोपरगाव ७२.२ मिमी अशी नोंद झाली आहे. याशिवाय पारनेर ३५.३ मिमी, श्रीगोंदा २२.९ मिमी. कर्जत २५.५ मिमी, शेवगाव ५४.१ मिमी, नेवासा ४९ ७ मिमी,
राहुरी ४९.८ मिमी, संगमनेर २८.८ मिमी, अकोले २१.७ निमी, श्रीरामपूर २३.६ मिमी, राहाता ३७.६ मिमी असा पाऊस झाला आहे.