Ahmednagar News : अहमदनगरमधील अनेक रत्नरूपी भूमिपुत्र विविध क्षेत्रात मोठमोठी कामगिरी करत आहेत. अहमदनगरच्या शिरपेचात आणखी एक अभिमानस्पद कौतुकाचा तुरा रोवला गेला आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन ३०० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला.
शेकडो लोक बेपत्ता आहेत. बचावकार्यात पारनेर तालुक्यातील मेजर सीता शेळके यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३१ तासांमध्ये १९० फुटांचा पूल तयार केला. बचावकार्यात यामुळे सुलभता आली.
बंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधील सत्तर जवानांच्या पथकात सीता शेळके एकमेव महिला अधिकारी होत. मराठमोळ्या मेजर सीता अशोक शेळके या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजच्या आहेत. त्या २०२१ मध्ये लष्करात दाखल झाल्या.
वायनाड (केरळ) जिल्ह्यातील चार गावांत विनाशकारी भूस्खलनामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्कराच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. पारनेर तालुक्यातील निघोजच्या स्वामी समर्थ बँकेचे अध्यक्ष अशोक शेळके यांची कन्या मेजर सीता शेळके यांनी या बचावकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
त्यांनी इंजिनिअर्स रेजिमेंटच्या टीमसोबत पूल बांधण्यासाठी आघाडीचे नेतृत्व केले. त्यांनी उभारलेल्या पुलावरून बुलडोझर, जेसीबीसारखी अवजड यंत्रसामग्री तातडीने मुंदकाईकडे रवाना झाली.
त्यांना मेजर अनिश यांनी सहकार्य केले.
भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने अगदी कमी कालावधीत आपत्तिग्रस्तांच्या मदतीसाठी १९० फूट लांबीचा बेली ब्रिज निर्माण केला. प्रतिकूल परिस्थितीत महिला सक्षमीकरण आणि टीमवर्कचे प्रदर्शन केले. याबाबत संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारतभूषण बाबू यांनी मेजर सीता व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
मेजर सीताचा मला अभिमानच…
केरळ राज्यातील वायनाड मध्ये भूस्खलनानंतर माझी मुलगी मेजर सीता शेळके व त्यांच्या ७० जणांच्या लष्करी टीमने रात्रंदिवस मेहनत करत लोखंडी पूल उभा केला. यातून जनतेला सर्व सोयी-सुविधा व मदत शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे या संकटकाळी सर्वसामान्यांना कर्तव्याच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. ही माझ्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब असल्याची प्रतिक्रिया मेजर गीता शेळके यांचे वडील अॅड. अशोक शेळके यांनी व्यक्त केली.