Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी नगर शहरातून जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव येणार असल्याने शहरात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
रविवारी पुणे शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. पुणे येथून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील बेलवंडीफाटा येथून सोमवारी नगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. तेथून ते पुणे रोडने केडगाव येथे येणार आहेत.
केडगाव चौकात मराठा बांधवांच्या वतीने जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायी रॅलीला सुरुवात होईल.
शहरासह जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून रॅलीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तालुकास्तरावर बैठका घेऊन रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापुरातही मोठी रॅली
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मराठा समाजाने त्यांच्या रॅलीचे जोरदार स्वागत केले. शिवाजी चौकामध्ये त्यांची जाहीर सभा झाली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून तसेच कोल्हापूरच्या स्थानिक मुद्यांवरुन त्यांनी सरकारला चांगलेच फटकारले. आम्ही गोडीने आरक्षण मागत आहोत त्यामुळे ते दिले पाहिजे तसे झाले नाही
तर शेवटचा पर्याय म्हणून विधानसभेला सगळे उमेदवार आम्हाला पाडावे लागतील असेही त्यांनी जाहीर केले.
असा असेल रॅलीचा मार्ग
बेलवंडी येथून पुणे रोडने केडगाव येथे आगमन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथून पायी रॅलीला सुरुवात. मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन.
मार्केटयार्ड येथून माळीवाडा, पंचपीर चावडी, कापडबाजार, चितळे रोड ते चौपाटी कारंजा. चौपाटी कारंजा येथे रॅलीचा समारोप होईल.