Ahmednagar News : पाथर्डी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उर्दू शाळेसमोरील भांड्याचे व्यापारी सुनील पाथरकर यांच्या पाथरकर भांडी भंडार, या दुकानाला काल रात्री अचानक लागलेल्या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले.
या आगीत पाथरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्री सुमारे दोन तास आग विजवण्याचे काम चालू होते. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या आगीत दुकानाचे दोन मजले जळून खाक झाले. आग लागल्यानंतर दुकानात असलेल्या प्लॅस्टिक,
सोल वायर, दोरखंड, पुठ्ठा बॉक्स, यामुळे काही मिनिटातच आग सर्वत्र पसरली; परंतु वेळीच उपस्थित तरुणांनी जीवावर उदार होऊन पाणी मारल्याने शेजारील फुटवेअर व रहिवासी इमारतीला काहीही नुकसान झाले नाही व मोठा अनर्थ टळला. परंतु आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले दुकान मात्र संपूर्ण जळून खाक झाले.
आग विझवण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी अक्रम आतार, देवा पवार, भैय्या शेख, शाहरुख लाला शेख, रशीद फारुख शेख, शाहरुख पिंजारी, अनिकेत निंगुरकर, मोहसीन आतार, नारायण लांडे, पंकज कोठांबे, वसंत पाथरकर, शाहरुख शेख, शादाब शेख
, अतुल उरशिळे, इमरान चौधरी, शोएब शेख, इरफान जावेद बेग, ऊजेर आतार, अनिल बडदे, प्रथमेश पंडित, ओमकार पंडीत आदी तरुण या मदतकार्यात धावुन आले. बघ्यांची गर्दी व वाहनांचा अडथळा, यामुळे मात्र अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
नगरपालिकेचे कर्मचारी अशोक डोमकावळे, रशीद शेख व इतर कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासात अग्निशामक बंबाच्या मदतीने आग विझवली. या वेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी पोलीस कर्मचारी अमोल आव्हाड, कृष्णा बडे यांनी याकामी मोठी मदत केली.