अहमदनगर महापालिका आयुक्त जावळेंच्या शोधासाठी किती पथके? स्वीय सहाय्यकाच्या घरात किती सापडली संपत्ती? पहा सविस्तर..

बांधकाम परवानगीसाठी ८ लाख रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी मनपाचे आयुक्त पंकज जावळे व त्यांचे स्विय सहाय्यक श्रीधर देशपांडे अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. जावळे व देशपांडे या दोघांविरुद्ध येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी (दि.२७) रात्री उशिरापर्यंत सुरू होती

Pragati
Published:
jawale

Ahmednagar News : बांधकाम परवानगीसाठी ८ लाख रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी मनपाचे आयुक्त पंकज जावळे व त्यांचे स्विय सहाय्यक श्रीधर देशपांडे अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. जावळे व देशपांडे या दोघांविरुद्ध येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी (दि.२७) रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

जालन्याच्या अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. बांधकाम परवाना मिळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेत ऑनलाइन प्रस्ताव दाखल केला होता. हा परवाना देण्यासाठी आयुक्त जावळे यांनी त्यांचा स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यामार्फत ९ लाख ३० हजारांच्या लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदार यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. पथकाने १९ व २० जून असे दोन दिवस महापालिकेत सापळा रचला. त्यावेळी देशपांडे यांनी तडजोडीअंती पंचसमकक्ष ८ लाखांची मागणी केली होती. तेव्हापासून पथक देशपांडे यांच्या मागावर होते.

गुरुवारी दुपारी हे पथक महापालिकेत दाखल झाले. त्यांनी आयुक्तांचे दालन सील केले. पथकातील अधिकाऱ्यांनी उपायुक्तांना बोलावून आयुक्तांच्या दालनाची झाडाझडती घेतली. त्यापूर्वी या पथकाने आयुक्तांच्या वसंतटेकडी येथील शासकीय निवासस्थानावर छापा मारला. त्यांच्या घरी कुणी नसल्याने निवासस्थान सील करण्यात आले.

देशपांडे यांची बीडमध्ये जमीन खरेदी
आयुक्त जावळे यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्या घराची पथकाने झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरात एकूण ९ मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. तसेच त्यांनी बीड जिल्ह्यात शेत जमीन खरेदी केल्याचीही कागदपत्रे मिळून आली असून, त्यांच्या संपत्तीची पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

त्यांच्या घरझडतीमध्ये ९३,००० रूपये रोख रक्कम, साडे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळुन आली आहेत. सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे मिळुन आली आहेत.

तीन पथके रवाना
बांधकाम परवाना देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व त्यांचा स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघे फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके रात्री उशिराने रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe