विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (७ ऑक्टोबर) सायंकाळी पुण्यात पार पडल्या. माजी आमदार राहुल जगताप यांनी गेली १० वर्षे शरद पवार यांना साथ दिली आहे, शिवाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यामुळे जगताप यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याचे सांगत, त्यांच्या समर्थकांनी श्रीगोंदे शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. मात्र, राहुल जगताप यांच्यासह नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नाईक,बीआरएस पक्षाचे नेते टिळक भोस यांनीही मुलाखती दिल्याने शरद पवार गटाकडून उमेद्वारीसाठी मोठी रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, शरद पवार गटाच्या मुलाखतींना २४ तास उलटत नाही, तोच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (ठाकरे गट) श्रीगोंद्याची जागा शिवसेना लढवणार असून,त्याला हिरवा कंदिल मिळाल्याचे सांगत मंगळवारी (८ ऑक्टोबर) सकाळी फटाक्यांची आतषबाजी केली.त्यामुळे येथील उमेदवाराची तिढा कायम असताना, जागा कोणाला जाते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे अण्णासाहेब शेलार यांनी यापूर्वीही शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. सध्या ते कोणत्याच पक्षात नसले, तरी विखे समर्थक म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांच्या उपस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असून, या मुलाखतीपूर्वी विखे यांना लोणीत भेटून ते गेल्याचे समजते.माजी आमदार राहुल जगताप यांनी संयमी भूमिका ठेवतानाच, इतरांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली नाही. निष्ठा आणि कार्यामुळे उमेदवारीबाबत आशावादी असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे.
अनुराधा नागवडे यांच्या नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाने मुलाखतीसाठी गेल्या महिन्यात अर्ज मागवले होते. त्यानुसार या मुलाखती घेण्यात आल्या, पण मुलाखतीच्या या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांचेही नाव दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मात्र, त्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य या मुलाखतीसाठी हजर नव्हते. कदाचित महायुतीवर दबाव आणण्यासाठी नागवडे यांनी हा इशारा दिल्याचे एका नागवडे समर्थकाने सूत्रांशी बोलताना सांगितले.गेली आठ दिवस नागवडे समर्थक ‘घड्याळ’ चिन्ह असलेले पत्रके गावोगावी वाटत असतानाच, मुलाखतीला त्यांचे नाव दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.