Ahmednagar News : दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कृष्णा- भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने हाती घेतली आहे. या योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे मराठवाड्याला दिले जाणार आहे. या कृष्णा – भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा, अशी मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था होऊन तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. तालुक्यात पाटपाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी आ. शिंदे यांनी कृष्णा -भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून याबाबतचा अहवाल मागवला असून, आ. शिंदे यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीमुळे जामखेड तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश देताच जलसंपदा विभागाने ६ जून रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरेविकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना एक पत्र लिहले आहे. महामंडळाने आ. शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार अहवाल सादर करावा असे या पत्रात म्हटले आहे.
कोल्हापूर, सांगली या भागात दरवर्षी कृष्णा व इतर नद्यांना आलेल्या पुराचे वाहून जाणारे पाणी वाया जाते. याच पाण्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना सरकारने आखली आहे. या योजनेतून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी दिले जाणार आहे. यातील पहिला प्रकल्प बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात राबवला जाणार असून, सदरचे काम वेगाने सुरु आहे.
आष्टी मतदारसंघात जाणारे पाणी कर्जत व जामखेड तालुक्यातून जाणार आहे. कर्जत व जामखेड, या दोन्ही तालुक्यांचा समावेश कृष्णा खोऱ्यात होतो. तरी या प्रकल्पात जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून अहवाल मागवला आहे.
जामखेड तालुक्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षांची मागणी महायुती सरकार कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमांतून पुर्ण होऊन तालुक्याला हक्काचे पाणी मिळेल.असा विश्वास आ. राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.