Ahmednagar News : न्याय देण्याऐवजी पीडितेवरच फेकले प्रेमाचे जाळे, अन्यायाची दाद मागायला आली, पोलिसाचीच नियत फिरली, नंतर…

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : : आपल्याकडे कुंपणच जेव्हा शेत खाते अशी एक म्हण आहे. आता याची प्रचिती अहमदनगरमधील एका घटनेवरून अली आहे. अन्याय झाला म्हणून दाद मागायला गेलेल्या पिडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत तपासी कर्मचाऱ्यानेच नको ते कृत्य केल्याचे समोर आले आहे.

त्या पिडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत प्रेमाचे जाळे फेकले, व्हॉट्सअपवर प्रेमाचे संदेश व व्हिडिओ कॉल करत त्रास दिल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. पीडित विवाहितेने याबाबत तक्रार अर्ज करताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी ‘त्या’ कर्मचाऱ्याची उचलबांगडी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात ही पीडित विवाहिता राहते. या तरुणीचे २०२३ साली लग्न झाले मात्र नंतर काही महिन्यातच सासरच्या व्यक्तींकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला. त्यामुळे या महिलेने थेट आपले माहेर गाठले अन पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल व्हावा, याकामी तक्रार अर्ज दाखल दिला.

तक्रार अर्जाचा तपास दोन पुरुष कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला. हे दोन्हीही कर्मचारी पीडितेच्या घरी गेले व त्यांनी तपासाकामी माहिती लिहून आणली. मात्र यातील एका पोलिसाची नियत फिरली व त्याने पीडितेचा तक्रार अर्जावर असलेला मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. त्याने पीडित महिलेला व्हॉट्सअपवर प्रेमाचे मेसेज व संदेश लिहिण्यास सुरुवात केली.

पीडितेना रिप्लाय न दिल्यामुळे या बहाद्दराने आता थेट व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात केली. आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण पोलिसांकडे दाद मागायला गेलो मात्र पोलिसच आपल्या एकटेपणाचा फायदा घेत असल्याने ती पीडिता खूपच अस्वस्थ झाली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

त्यानंतर तिने संबंधित पोलिस कॉन्स्टेबलच्या कृत्यांची माहिती संबंधित उपविभागीय अधिकारी यांना तक्रार अर्जाद्वारे दिली. या अर्जानंतर संबंधित पोलिस कॉन्स्टेबलची अकोले पोलिस ठाण्यातून बदली करण्यात आली. मात्र या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्याची मागणी केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe