Ahmednagar News : कोल्हे यांना खिंडीत गाठण्यासाठी त्यांच्या संस्थांची चौकशी ?

Pragati
Updated:

Ahmednagar News : नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्या संस्थांवर विविध विभागांकडून चौकशी केली जात आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून विवेक कोल्हे अध्यक्ष असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पात व ते विश्वस्त असलेल्या शिक्षण संस्थेत शासनाच्या विविध विभागांकडून तपासणी सुरू आहे.

यात आतापर्यंत तीन वेळा राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग यासह विविध शासकीय पथके कोपरगावात दाखल झाली आहेत. विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच ही चौकशी केली जात आहे; हे विशेष.

नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या भाजपच्या माजी आमदार आहेत. तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे ते नातू आहेत. त्यामुळे विवेक कोल्हे हे भाजपशी जवळीक असणारे आहेत. नाशिक मतदारसंघात त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.

तर या मतदारसंघात महायुतीतील शिंदेसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे हे निवडणूक लढवत आहेत. विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आला होता, मात्र त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासमोर अडचणी उभ्या राहू शकतात.

त्यामुळे विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी त्यांच्या विविध संस्थांवर शासनाच्या विविध विभागाकडून तपासण्या सुरू असल्याची चर्चा कोपरगावसह जिल्ह्यात रंगली आहे.

याबाबत शासकीय यंत्रणांकडून दुजोरा मिळत नसला तरी याची राजकीय वर्तुळात तशी चर्चा आहे. दरम्यान संजीवनी उद्योग समूहावर आजवर एकही ठपका नाही. आम्ही केवळ शिक्षक निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला म्हणून आकसाने संस्थांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत, असाच त्याचा अर्थ निघतो.

शिक्षक मतदारसंघात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांची पाठराखण होत आहे. उमेदवारी अर्जदाखल करताना काही उमेदवारांना हाणामारी करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र दुसरीकडे आमच्या संस्थांची तपासणी केली जात असल्याची खंत कोल्हे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe