पाऊस झाला अन २७ गावांचे टँकर झाले बंद, पण २२ गावांत अद्यापही पाणीटंचाई, खा. लंकेच्या तालुक्यातील स्थिती..

Ahmednagar News : पावसाने रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान दिसले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच पेरण्याही करून घेतल्या. तर दुसरीकडे २७ गावांसह वाड्या-वस्तीवरील शासकीय टँकरही बंद झाले. परंतु सध्या २२ गावांसह वाड्या-वस्त्यांवर अद्यापही पाणीटंचाई जाणवत आहे.

तर दुसरीकडे पेरणी केलेला शेतकरी पाऊस अचानक गायब झाल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलाय. ही स्थिती आहे खा. निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील. ३० जूनला या गावातील टँकरच्या पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासह स्थानिक अहवाल व परिस्थितीनुसार येथील टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करायचा की सुरू ठेवायचा याबाबत निर्णय घेतील. तालुक्यात एकूण ४९ गावांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. पाऊस झाल्याने आता १३ जूनपासून २२ गावांसह वाड्या-वस्त्यांवर टँकर बंद केला आहे.

या गावातील टँकर बंद
बाभूळवाडा, पिंपळगाव तुर्क, करंदी, वाळवणे, बाबुर्डी, वडनेर हवेली, किन्ही, रायतळे, घाणेगाव, सुपा, पळवे बुद्रुक, मुंगशी, पळवे खुर्द, काकणेवाडी, हत्तलखिंडी, रुई छत्रपती, कडूस, पानोली, वडुले, तिखोल, शहाजापूर, वडगाव सावताळ, पळसपूर, खडकवाडी, सिद्धेश्वर वाडी, गारगुंडी, कासारे.

या गावातील टँकर आहेत सुरु
विरोली, कान्हूर पठार, पिंपरी पठार, वेसदरे, भोंद्रे, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, जामगाव, ढोकी, पुणेवाडी, कर्जुले हर्या, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा, सावरगाव, नांदूर पठार, पळसपूर, वारणवाडी, पोखरी, काटाळवेढा, वासुंदे, पळशी, वनकुटे

शेतकऱ्यांचेही पावसाकडे लक्ष
तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, आता पाऊस लांबल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा पाऊस वेळेवर आल्याने काहीच अडचण येणार नाही.

अशीच सर्वांची अपेक्षा असतांनाच सध्या तालुक्यातील बऱ्याच भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. तालुक्यात जूनच्या प्रारंभी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागले.

याच जोरदार पावसावरच खरीप पेरण्या पूर्ण केल्या. आता महिना होत आला तरी तालुक्याच्या बऱ्याच भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.