Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलने केली तसेच या आंदोलनांना राज्यव्यापी बनवण्यात देखील त्यांना यश आले. त्यांच्या मागण्या मान्य केल्या असे एकीकडे सरकार म्हणत असतानाच दुसरीकडे सगेसोयरे बाबत मनोज जरांगे मात्र ठाम आहेत.
आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. ते येत्या ४ जूनला पुन्हा उपोषणाला बसणार असून येत्या ८ तारखेला सभाही घेणार आहेत. दरम्यान आता या बाबत अहमदनगरमधील मराठा समाजाने काय म्हटलं आहे ते आपण पाहूयात –

मनोज जरांगे पाटील यांनी 4 जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी आता उपोषण करू नये. त्यांची तब्येत ही खालावलेली तर आहेच शिवाय डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नका असा सल्ला दिलाय.
त्यामुळे त्यांनी आता उपोषण न करता मराठा बांधवांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश द्यावा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत अशा पद्धतीची भूमिका आता अहमदनगरमधील मराठा कार्यकर्त्यांनी घेतलीये.
यावेळी बोलताना मराठा आंदोलक म्हणतात की, मनोज जरांगे पाटील गेल्या आठ महिन्यांपासून लढा देत आहेत. राज्यव्यापी आंदोलन होऊनही सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने जरांगे पाटील यांना 4 जूनपासून उपोषण करावे लागत आहे.
डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नये असा सल्ला दिला आहे. एक दिवस देखील उपोषण करू नये असे त्यांनी म्हटलेय. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असून लोकसभेतून मराठा समाजाची ताकद दिसणारच आहे असे ते म्हणाले.
त्यांनी उपोषण करू नये रस्त्यावर उतरून लढण्याचे आदेश आता त्यांनी द्यावेत अशी मराठा बांधव म्हणून आमची मागणी आहे. तुमच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा असून तुम्ही जी रणनिती ठरवाल त्याचे मराठा समाज पालन करेल असा शब्द मराठा बांधवांनी दिला आहे.