Ahmednagar News : जमिनीच्या वादातून शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शेतकरी नशिर शेख यांचे रात्रीच्यावेळी राहत्या घरातून अपहरण करून कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवार (दि.२१) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत नशिर शेख यांचा मुलगा आजिम नशिर शेख (वय २०), याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांत अलीम बन्नोमियाँ शेख याच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, जमिनीच्या वहिवाटीच्या वादातून अलीम बन्नोमियाँ शेख व त्यांच्या दोन साथीदारांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला करून माझ्या वडिलांना बळजबरीने गाडीत घालून घेऊन जाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

आमची कांबी शिवारात शेतजमीन असून, सदर जमिनीचा बन्नोमियाँ शेख (रा. कांबी) यांच्याशी आमचा एक वर्षापासून वाद सुरू आहे. शुक्रवार (दि. २१) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अलीम बन्नोमियाँ शेख व त्यांच्या दोन साथीदारांनी आमच्या घरात बळजबरीने घुसून माझ्या वडिलांना तसेच माझी आई व बहिणीला लाथा बुक्क्यांनी,
लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच माझे वडील नशीर शेख यांना बळजबरीने चारचाकी गाडीत टाकून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गाडीतील काचेच्या दारूच्या बाटल्या डोक्यावर फोडून रक्तभांबाळ केले. त्यानंतर आरोपी अलीम बन्नोमियाँ शेख व त्याच्या दोन साथीदारांनी जखमी असलेले माझे वडील नशीर शेख यांना शेवगाव-पाथर्डी रोडवर काही अंतरावर सोडून निघून गेले.
या गुन्ह्यामधील एका आरोपीला अटक केली असून, उर्वरित दोन आरोपींचा तपास युद्धपातळीवर चालू आहे. लवकरच या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी गजाआड करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी दिली.