Ahmednagar News : सडून मरण्यापेक्षा लढून मरू; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा चक्काजाम होणारच,शेतकरी आंदोलनावर ठाम

Pragati
Published:

Ahmednagar News : एकीकडे दुधाचे भाव पडत आहेत. अन पशुखाद्याचे भाव मात्र वाढत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला आधार देण्याऐवजी त्यांची गळचेपी करत असल्याचे म्हणत सामान्य माणसाला आचारसंहिता नसते असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा चक्काजाम होणारच असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.पडलेल्या दूध दराबाबत मंगळवारी (दि. २५) हरेगाव फाटा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला असून तसे श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देखील दिले होते.

मात्र तहसीलदारांनी उलट आंदोलकांनाच नोटिसा काढल्या असून नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने आंदोलन करू नये, यासंदर्भात नोटीस बजावली आहे; परंतु त्यानंतरही आंदोलक आंदोलनावर ठाम आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाच्या दरासंदर्भात मंगळवारी (दि. २५) हरेगाव फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्याचे निवेदन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना नुकतेच दिले होते. त्यानंतर तहसीलदार वाघ यांनी निवडणूकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून आंदोलन स्थगित करण्याबाबत सहा प्रमुख कार्यकर्त्यांना लेखी नोटीस बजावली आहे; परंतु शेतकऱ्यांची सरकारकडून सर्रास लूट सुरू असून आचारसंहितेमध्ये सरकारलालूट करता येते का? असा सवाल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी उपस्थित केला आहे.

माळेवाडी व पाचेगाव येथील दूध उत्पादकांच्या जनजागृती सभेत ते बोलत होते. मंचावर शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, जिल्हा संघटक भास्कर तुवर, नेवासा तालुका युवा आघाडीचे डॉ. रोहित कुलकर्णी, साहेबराव चोरमल, पाचेगाव सरपंच वामनराव तुवर उपस्थित होते.माळेवाडी येथील सभेस सागर गिडे, प्रकाश ताके, अनिल रोकडे आदी आंदोलनकर्ते दूध उत्पादकांसह शाहूराज वमने, भागचंद औताडे, सिताराम औताडे, रोहिदास वमने, अमोल वमने, बंडू औताडे, नाना बहिरट, रवी नेद्रे, भाऊराव औताडे, बाबुराव गोरे आदी शेकडो दूध उत्पादक उपस्थित होते.

औताडे पुढे म्हणाले, की आचारसंहिता ही शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेचसंविधानिक पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनाअसते. सामान्य माणसाला आचारसंहिता असल्याचे कुठल्याही कायद्यात अभिप्रेत नाही.

त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून आंदोलन स्थगित करण्याची नोटीस दिली आहे, हे शेतकऱ्यांनी ओळखले आहे. सडून मरण्यापेक्षा लढून मरू, असा एल्गार करून २५ तारखेचा चक्काजाम करणारच, असा एकमुखी निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारने कितीही वेळा परवानग्या नाकारल्या असल्या, तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा चक्काजाम होणारच असा इशारा औताडे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe