Ahmednagar News : वाढती महागाई सर्वसामान्यांचा पिच्छा सोडत नाहीये. त्यातच आता महावितरणने जास्त लाईटबीलचा शॉक दिलाय. एप्रिलपासून प्रतियुनिट वीजदर आणि स्थिर आकारात वाढ झाल्याने अनेकांना आताची लाइटबिले २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढून आली असल्याने सामान्य ग्राहक हैराण झाले आहेत.
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिकसाठीचे वीजबिल थकले तर तातडीने वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे ग्राहक नाइलाजास्तव वाढीव बिल भरताना दिसतायेत.
किती रुपयांनी झाली आहे वाढ
घरगुतीसाठी पूर्वी १०० युनिटपर्यंत ४ रुपये ४१ पैसे वीज दर होता. आता तो ४.७१ पैसे झाला आहे. ३०० युनिटपर्यंत ९ रुपये ६४ पैसे होते. आता १०.२९ रुपये झाला आहे. ५०० युनिटपर्यंत १३ रुपये ६१ पैसे होता. आता १४ रुपये ५५ पैसे झाला आहे.
५०० युनिटच्या पुढे प्रतियुनिट १५ रुपये ५७ पैसे होता. आता १६ रुपये ६४ पैसे झाला आहे. व्यावसायिकचा २० किलोवॉटचाच प्रतियुनिट पूर्वी ८ रुपये २७ पैसे दर होता. आता ८ रुपये ५२ पैसे झाला आहे. ५० किलोवॉटपर्यंत १२ रुपये ६३ पैसे होता.
आता १३ रुपये १ पैसे दर झाला आहे. ५० किलोवॉटच्या पुढे प्रतियुनिट १४ रुपये ९३ पैसे होता. आता १५ रुपये ३८ पैसे झाला आहे. औद्योगिकचा २० किलोवॉटपर्यंत प्रतियुनिट ५ रुपये ९८ पैसे, तर ६ रुपये १६ पैसे दर झाला आहे. २० किलोवॉटच्या पुढे प्रतियुनिट ७ रुपये ८ पैसे होता. आता ७ रुपये ३० पैसे झाला आहे.
स्थिर आकारातही वाढ
घरगुतीमध्ये सिंगल फेजसाठी प्रतिमहिना स्थिर आकार ११६ रुपयांवरून १२८ रुपये झाला आहे. थ्री फेजसाठी ३८५ रुपयांवरून ४२४ रुपये झाला आहे. व्यावसायिकचे दरमहा स्थिर आकार ४७० वरून ५१७ पर्यंत वाढ झाली आहे.
औद्योगिकमध्ये २० किलोवॉटपर्यंत प्रतिमहिना ५३० होते. आता ५८३ रुपये झाले आहे. २० किलोवॉटच्या पुढील वीजवापरासाठी ३५३ रुपयांवरून ३८८ रुपये केला आहे.