Ahmednagar News : मज्जाचमज्जा; आता शाळेत मुलांना पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ !

Pragati
Published:

Ahmednagar News : नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरु होत आहे. त्यामुळे सध्या पालकांची शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता राज्यात इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे.

मात्र या नव्या शैक्षणिक वर्षात केंद्र सरकारच्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेच्या धर्तीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सकस पोषण आहारात मसालेभात, पुलाव, अंडा पुलाव, मूगडाळ खिचडी, वरणभात, तांदळाची खीर, नाचणीसत्त्व आदी १५ पदार्थ देण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण विभागाने दिले आहेत.

सध्या सरकारकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. आहाराची पौष्टिकता, दर्जा सुधारण्याबरोबर त्यामध्ये तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश केला जातो. विद्यार्थ्यांच्या आहारात वैविधता आणण्यासाठी शासनाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांची एक समिती नेमली होती. या समितीने पाककृतीसह योजनेत सुधारणा करण्यासाठी शिफारशी केल्या आहेत.

त्यानुसार आता तांदूळ, डाळी आणि कडधान्यापासून तयार केलेला ताजा सकस आहार, मोडआलेले कडधान्य, नाचणीसत्त्व, खीर यांच्यासोबतच पुलाव, खिचडी आणि मसालेभात विद्यार्थ्यांना देण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान पोषण आहार शक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२४ ते २५ या शैक्षणिक वर्षासाठी १५ प्रकारच्या पाककृतीचा तक्ता तयार केला आहे. प्रत्येक दिवशी याप्रमाणे एक आहार सूची तयारकरावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांत वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल.

राज्यातील प्रत्येक शाळांनी या स्वरूपातील आहार विद्यार्थ्यांना द्यावा, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्षांपासून मुलांना मात्र पोषण आहारात वेगवेगळे तब्बल १५ प्रकारचे पदार्थ खाण्यास मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe