Ahmednagar News : गौण खनिज तस्करी करणाऱ्या डंपरने नगरच्या मोटारसायकलस्वारास चिरडले

Published on -

Ahmednagar News : जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी केली जात आहे. कमी वेळात जास्त वाळू वाहुतक करण्यासाठी ही वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगात असतात. त्यामुळे शेकडो अपघात होऊन अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत.

या वाहनांची मोठी दहशत असल्याने या भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. राहुरी तालुक्यात देखील महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू व गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गौण खनिज तस्करी करणाऱ्या एका डंपरने दि. ९ जून २०२४ रोजी सकाळच्या सुमारास एका मोटारसायकलस्वारास धडक देऊन चिरडले. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील डिग्रस, वरवंडी, देसवंडी, राहुरी शहर, कणगर, कोल्हार खूर्द आदी भागामध्ये वाळू व गौण खनिज तस्करी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे सुरु आहे. काही भागात महसूल व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने ठेक्याच्या नावाखाली रॉयल्टी न भरता गौण खनिज तस्करी सुरु आहे. वाळू व गौण खनिज तस्करी करणाऱ्या वाहनांमुळे आजपर्यंत शेकडो अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत; मात्र महसूल व पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादामुळे तस्करी राजरोसपणे सुरुच आहे.

रविवारी दि. ९ जून २०२४ रोजी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास गौण खनिज तस्करी करणाऱ्या डंपरने (क्र. एमएच १६ सीसी ७३२६) महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात कॅनॉलजवळ नगर- मनमाड महामार्गावर मोटारसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार सुरेश सुभाष साळुंके (रा. नालेगाव, नगर) हा तरुण चाकाखाली चिरडल्याने जागीच ठार झाला. डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. एका ठिकाणी कचखडी खाली करुन पसार होण्याचा प्रयत्न करत होता. काही स्थानिक नागरीकांनी सदरचा डंपर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News