Ahmednagar News : प्रेमसंबंध झाले मात्र लग्न न होऊ शकल्याने पढेगाव येथील एका ३५ वर्षीय नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणी ही पुणे येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती.
अकोला जिल्ह्यातील मनीष मोगरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. तसेच गजानन थाटे याने लग्न होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे निराश झालेल्या युवतीने आत्महत्या केली आहे. हे दोघेही पोलीस दलात कार्यरत होते.
या घटनेस दोषी पोलिस अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. पढेगाव येथील तरुणी पिंपरी चिंचवड येथे नर्स म्हणून काम करत असताना ती तेथे होस्टेलमध्ये राहायची. कुटुंबीयांनी तिला लग्नाबाबत विचारणा केल्यावर तिने एका मुलासोबत प्रेम असून आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितले होते.
तरुणी ८ फेब्रुवारी रोजी पढेगाव येथे घरी आली होती परंतु ती सातत्याने बडबड करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनोरुग्ण डॉक्टरांकडे तिला नेले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच पहाटे घरातून गायब झाली. त्यानंतर २२ रोजी एका विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता.
त्यानंतर नातेवाईक ती जेथे नोकरीला होती, त्याठिकाणी गेले. तिच्या बॅगा व सामान घेऊन आले. त्या बॅगेत चिठ्ठी सापडली. यामध्ये तिने पीएसआय मनीष मोगरे (अकोला) याच्याशी लग्न करणार असल्याची बाब लिहून ठेवलेले दिसले. मोगरे याने तरुणीशी नंतर संपर्क तोडला असल्याची माहिती समजली असून पोलिस गजानन थाटे व मनीष याला माफ करू नका असे तिने लिहिले असल्याचे समजते.
दरम्यान आता तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मनीष मोगरे व गजानन थाटे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.